प्रयोग व त्याचे प्रकार | Prayog in Marathi | प्रयोग मराठी व्याकरण

Prayog in Marathi | प्रयोग व त्याचे प्रकार | प्रयोग मराठी व्याकरण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेखात प्रयोगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण या लेखात प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे प्रकार कोणते? त्यांची स्पष्टीकरनासहीत उदाहरणे आपण बघणार आहोत. शाळेत मराठी विषयाच्या परीक्षेत प्रयोगावर दोन तीन प्रश्न हमखास विचारले जातात.

आज आपण येथे प्रयोगाबद्दल सखोल माहिती बघणार आहोत. जी आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

प्रयोग म्हणजे काय?

वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात. प्रयोग हा शब्द संस्कृत ‘प्र + युज’ (योग) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे.

प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते, त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात.

प्रयोगाचे प्रकार

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

 1. कर्तरी प्रयोग
 2. कर्मणी प्रयोग
 3. भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग

पुढील वाक्य पहा.

तो गाणे गातो.

 1. ती गाणे गाते.
 2. ते गाणे गातात.
 3. तू गाणे गातोस.

यातील मूळ वाक्यात ‘तो’ हा करता आहे. गाणे हे ‘कर्म’ आहे. आणि ‘गातो’ हे क्रियापद आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी गातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की, कर्माप्रमाणे बदलते, हे आपण शोधूया. त्यासाठी क्रमाने लिंग, वचन व पुरुष बदलून पाहू. असा बदल करताना एकावेळी एकच प्रकारचा बदल करणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.

वाक्य क्र. 01 पहा. ‘तो’ या पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘ती’ हा स्त्रीलिंगी करता ठेवला. त्याबरोबर ‘गातो’ हे क्रियापदाचे रूप बदलते व ते ‘गाते’ असे झाले. म्हणजे या वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते, असे ठरले.

वाक्य क्र. 02 पहा. ‘तो’ या कर्त्याचे अनेक वचनी रूप ‘ते’ ठेवले. त्याबरोबर क्रियापदाची रूप ‘गातात’ असे झाले.

वाक्य क्र.03 पहा. कर्त्याचा पुरुष बदलून ‘तू’ हा द्वितीय पुरुषी कर्ता ठेवताच क्रियापदाचे रूप ‘गातोस’ असे झाले.

याचा अर्थ असा की, ‘तो गाणे गातो’ या वाक्यातील ‘गातो’ हे क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलले आहे. म्हणजेच इथे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकूमत चालवितो.

कर्तरी प्रयोग उदाहरण

 1. तो गावी गेला.
 2. ती गावी गेली.
 3. ते गावी गेले.

कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात व क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदाहरण –

 • ती गाणे गाते. (सकर्मक कर्तरी प्रयोग)
 • ती घरी जाते. (अकर्मक कर्तरी प्रयोग)

कर्मणी प्रयोग

पुढील वाक्य पहा.

मुलाने आंबा खाल्ला.

 • मुलीने आंबा खाल्ला.
 • मुलांनी आंबा खाल्ला.
 • मुलाने चिंच खाल्ली.
 • मुलाने आंबे खाल्ले.

वरील वाक्यात ‘मुलाने’ हा कर्ता आहे. आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी कर्त्याचे लिंग व वचन बदलून पहा.

‘मुलांनी’ याच्या ऐवजी ‘मुलीने’ किंवा ‘मुलांनी’ असा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप ‘खाल्ला’ तसेच राहते.

कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही. म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे.

आता कर्त्याचे लिंग बदलून पहा. ‘आंबा’ ऐवजी ‘चिंच’ हे ‘स्त्रीलिंगी’ कर्म ठेवले तर, क्रियापदाचे रूप ‘खाल्ली’ असे होईल.

आता वचन बदलून पहा. ‘आंबे’ हे कर्म झाले तर “मुलाने आंबे खाल्ले” असे वाक्य होईल व त्यात क्रियापद ‘खाल्ले’ असे होईल म्हणजे या वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. म्हणून हा कर्मणी प्रयोग होय.

कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते. म्हणजेच कर्म हा धातूरुपेश आहे.

कर्मणी प्रयोग उदाहरण

 1. मुलीने आंबा खाल्ला.
 2. मुलांनी आंबा खाल्ला.
 3. मुलाने चिंच खाल्ली.
 4. मुलाने आंबे खाल्ले.

कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असणार नाहीत. कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही. या प्रयोगातील क्रियापद सकर्मक असते.

भावे प्रयोग

पुढील वाक्य पहा.

 1. मुलाने बैलास मारले.
 2. मुलांनी बैलास मारले.
 3. मुलीने बैलास मारले.
 4. मुलाने गाईस मारले.

या वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग व वचन बदलून पाहू.

‘मुलाने’ या ऐवजी ‘मुलीने’ किंवा ‘मुलांनी’ असा कर्ता ठेवला तरी क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.

‘बैलास’ या कर्म ऐवजी ‘गाईस’ असे स्त्रीलिंगी रूप किंवा ‘बैलांना’ असे अनेक वचन रूप ठेवले तरी क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी असून स्वतंत्र असते. तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.

भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात.

भावे प्रयोग उदाहरण

 1. रामाने रावणास मारले.
 2. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
 3. त्याने आता घरी जावे.

सारांश | Prayog in Marathi | प्रयोग व त्याचे प्रकार

मित्रहो, वरील लेखात आपण प्रयोग म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते याविषयी सविस्तर माहिती बघितली. ही माहिती आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडेल अशी आम्हाला खात्री आहे. ही माहिती स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील खूप उपयोगी आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment