शाळेचे मनोगत निबंध मराठी | Shaleche Manogat Nibandh Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात शाळेचे मनोगत निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आज आपण या लेखात एकूण 4+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत. शाळेत शिक्षकांनी आपल्याला शाळेचे मनोगत, शाळेची आत्मकथा, किंवा शाळेचे आत्मवृत्त या विषयी निबंध लिहायला सांगितल्यास ही खालील निबंध अभ्यासा. ही निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.
शाळेत परीक्षेमध्ये आपल्याला मराठी विषयामध्ये आत्मकथनपर निबंध लिहिण्यास सांगितले जाते. हा प्रश्न 5 ते 10 गुणासाठी विचारला जातो. अशावेळी आपण ही निबंध अभ्यासू शकता. अशाप्रकारचे दुसरे अनेक निबंध तुम्ही अभ्यासू शकता. जसे की शेतकऱ्याचे मनोगत, झाडाचे आत्मवृत्त, शाळेचे मनोगत इत्यादी. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.
- हे देखील वाचा – शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
शाळेचे मनोगत निबंध मराठी | Shaleche Manogat Nibandh Marathi – निबंध क्र.01
// शाळेचे मनोगत //
रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टीच होती. मी आणि माझे चार-पाच मित्र आम्ही शाळेजवळील चाळीतच राहायचो. त्यामुळे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही सर्वजण शाळेच्या कुंपणावरून उडी मारून शाळेच्या मैदानावरच क्रिकेट खेळायला जायचो. हा रविवार पण असाच होता. आमच क्रिकेट खेळून झालं होतं.
खेळून खूप दमलो होतो. म्हणून आम्ही शाळेच्या बंद असलेल्या दरवाजा जवळील पायऱ्यांवर गप्पा मारत बसलो. अचानक एक आवाज आला. “काय विद्यार्थी मित्रांनो, दमलात की काय?” आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो. कोण आवाज देतय आम्हाला? पण कोणीच दिसेना. मग पुन्हा आवाज आला. “अरे मी शाळा बोलतेय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय”. आम्ही आश्चर्यचकित होऊन ऐकू लागलो आणि पुढे शाळा आमच्याशी संवाद साधू लागली.
हो विद्यार्थी मित्रांनो, खरंच मी शाळा बोलते. तुमची शाळा. दररोज सकाळी 10 वाजता तुमची वाट पाहणारी शाळा. तुम्ही इथे आल्यावर तुमच्या ज्ञानात भर घालणारी शाळा. तुमचा दंगा, मस्ती, हसणं, रडणं सगळं अगदी जवळून पाहणारी शाळा. तुम्ही सायंकाळी घरी जात असताना तुमच्याकडे टक लावून बघणारी शाळा. उद्या सकाळी तुम्ही पुन्हा येणार म्हणून तुमची आतुरतेने वाट बघणारी शाळा. तुमच्या विषयी लळा असणारी शाळा.
बाळांनो, खूप वर्षापासून मी इथेच आहे. सुरुवातीला माझ्याकडे दोनच वर्ग खोल्या होत्या. तरीही मी आनंदीच होते. कारण माझ्याकडे किती वर्गखोल्या आहेत याची मला काहीच सुख किंवा दुःख नाही. परंतु तुमच्यासारखी गोड मुलं माझ्यासोबत असतात. माझ्या अवतीभवती खेळतात, बागडतात, अभ्यास करतात, आपले जीवन घडवतात. यातच मला आनंद आहे.
सुरुवातीला माझ्यासोबत वीस मुले होती. आज मुलांची संख्या साडेचारशे च्या वर गेली. वर्ग खोल्या दोनच्या 20 झाल्या. शिक्षकांची संख्याही वाढली. एकचे दोन शिपाई झाले. खूप आनंद वाटतो हा प्रवास बघून. खूप चांगले वाईट दिवस या प्रवासात बघायला मिळाले.
माझी नजर सगळ्यांवर असते. अगदी तुमच्यासारख्या गोड मुलांपासून मुख्याध्यापकांपर्यंत आणि मोठ्या आलिशान गाडीतून येणाऱ्या संस्था चालकांपर्यंत सुद्धा. जसा एखाद्या कंटाळवाण्या तासाला तुम्हाला कंटाळा येतो. तसं मलाही तुमचा वर्ग शांत बघून खूप कंटाळा येतो. एखाद्या तासाला तुम्ही खूप हुरहुरीने उत्तर देता.
हे बघून खूप आनंद होतो आणि तुम्हा सर्वांचे खूप कौतुकही वाटते. तुम्ही मैदानावर गेल्यावर जेव्हा खूप धमाल करतात. ते पाहून माझाही आनंद गगनात मावत नाही. तुम्हाला नेहमी आनंदी बघायला आवडतं बरं का मला.
हे बघून खूप आनंद होतो आणि तुम्हा सर्वांचे खूप कौतुकही वाटते. तुम्ही मैदानावर गेल्यावर जेव्हा खूप धमाल करतात. ते पाहून माझाही आनंद गगनात मावत नाही. तुम्हाला नेहमी आनंदी बघायला आवडतं बरं का मला.
म्हणून तुम्हाला एकच सांगायचं. माझी ही काळजी घ्या. जशी तुमच्या घराची काळजी घेता अगदी तशीच. तुमच्याशिवाय माझा आहे तरी कोण? एवढे बोलून शाळा रडू लागली. आभाळ ही दाटून आलं होतं. थोड्याच वेळात पावसाची रिमझिम सुरू झाली.
सगळा मैदान आणि शाळा चिंब भिजली. आम्हीही धावत धावत घरी आलो. आम्हीही भिजलो होतो. त्या दिवसापासून आम्ही एक ठरवलं की, शाळेच्या आवारात कचरा करणार नाही आणि कुणाला करूनही देणार नाही. अगदी घर जसे स्वच्छ ठेवतो. तशी शाळेला स्वच्छ ठेवणार.
-: समाप्त :-
शाळेचे मनोगत निबंध मराठी | Shaleche Manogat Essay in Marathi – निबंध क्र.02
// मी शाळा बोलतेय //
ही आवडते मज मनापासुनी शाळा !
लावीते लळा ही जसा माऊली बाळा !!
या केशवकुमारांनी लिहिलेल्या पंक्तीत शाळेचे किती सुंदर वर्णन केलेले दिसून येते. या ओळींचा अर्थ असा होतो की, शाळा ही मुलांवर एवढे प्रेम करते, मुलांना एवढा लळा लावते, जशी एखादी आई आपल्या मुलांवर प्रेम, माया करते. किती सुंदर शब्दात कवींनी माझे वर्णन केले आहे. माझे म्हणजेच शाळेचे बर का! थांबा थांबा आश्चर्यचकित होऊ नका. मी तुमची सगळ्यांची लाडकी शाळा बोलतेय. होय मी शाळा बोलतेय.
मित्रांनो तसं पाहिलं तर मी दगड, विटांनी बनलेली निर्जीव वस्तू. मला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळेच सजीवत्व प्राप्त होते. तुम्ही माझ्या अंगा खांद्यावर खेळता, बागडता, नाचता, पडता ते मला खूप खूप आवडतं.
शाळा भरण्यापूर्वी एवढी दंगा करणारी तुम्ही मुले शाळा भरल्याची घंटा ऐकताच कसे आपापल्या वर्गाच्या ओळी करून रांगेत शिस्तीने उभे राहून प्रार्थना म्हणता. प्रत्येक तासाला त्या त्या शिक्षकांनी शिकवलेले मनापासून ऐकता. आणि मुख्याध्यापकांची चाहूल जरी लागली तरी कसे सावध होता. हे मी या चार भिंतीच्या आत अनुभवते ना!
राष्ट्रीय सण, नेत्यांची जयंती, पुण्यतिथी आणि शालेय तपासणी असली की, तुमचा उत्साह तर पाहण्यासारखा असतो. शाळेची तपासणी असेल तर मला सजवले जाते. माझ्या वर्गांना रंग देऊन छान कसे दिसतील हे पाहिले जाते.
कचरा होऊ नये म्हणून माझ्या प्रत्येक कक्षेत कचरा पेटीचे केलेले नियोजन खूप छान आहे. शाळेच्या स्वच्छतेबरोबरच सुविचाराची फळे, तर तुम्ही कधी विविध हातानी काच पेट्या सजवता, वर्गा वर्गामध्ये रंगीत पताका, अभ्यासपूर्ण तक्ते, कार्यानुभावाच्या तासाला कुंडीत लावलेले रोपांमुळे आणि रांगोळीच्या सड्यांमुळे माझ्या सौंदर्यात भर पडताना तेव्हा तर मी एकदम बहरूनच जाते.
इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मी तुमच्या जीवनातील अविभाज्य अंगच होऊन जाते. जेव्हा तुमच्या उंचावणाऱ्या प्रगतीचा आलेख मी पाहते, तेव्हा माझे डोळे भरून येतात.
तुम्ही मुलं आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये विजयी होऊन येता ना! तेव्हा माझा रूम रूम पुलकित होतो आणि आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे शिक्षक आपल्या शाळेत आहेत हे पाहून माझा उर भरून येतो. तुम्ही केलेली हस्तलिखिते, तुम्ही सहलीचे केलेले नियोजन, तुमची स्नेहसंमेलने त्यासाठी घेतलेले श्रम, या साऱ्यांची मी साक्षीदार आहे बर का!
मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये ठेवलेली तुम्ही मिळवलेली बक्षिसे, ढाली, प्रशस्तीपत्रके आणि शाळेच्या प्रगतीचा आलेख, दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे असलेला फलक, अंगावर मिरवताना माझ्यासारखी भाग्यवान मीच! हा विचार मनात डोकावतो.
पण तुमचे काही मित्र मला अजिबातच आवडत नाहीत. बघा ना! गेल्या वर्षी छानसा रंग देऊन मला आकर्षक रूप दिलं. पण तुमच्या काही मित्रांनी जिन्यातून येता जाता माझ्या अंगावर घडूने, पेन्सिलनेच नाही तर ब्लेड कर्कटकनेही रेघोट्या मारल्या. किती वेदना मला झाल्या म्हणून सांगू?
परीक्षा संपल्यावर सुट्टी लागणार या कल्पनेने तुम्ही खुश असता. आणि मी मात्र एकाकीपणाच्या कल्पनेने उदास होते. हे मैदानही तुमच्याविना सून-सून होतं. दहावीच्या निरोप समारंभाच्या वेळी मात्र तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी गहिवरते. पण क्षणभरच, कारण दहावीच्या परीक्षेनंतर एका नव्या विश्वात तुम्ही प्रवेश करणार आहात. ते जग तुम्हाला खुणावतय. तुमच्या उज्वल भविष्यासाठी आपली ताटातूट अपेक्षित आहे ना?
म्हणूनच मी भरल्या डोळ्यांनी मूकपणे तुम्हाला आशीर्वाद आणि निरोप देते. पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या नव्या पिढीच्या शिलेदारांच्या स्वागतासाठी सज्ज होऊन रंगीबेरंगी पताकांनी सजवून सनईच्या मंजुळ स्वरात हसतमुखाने पुन्हा उभी राहते.
-: समाप्त :-
शाळेचे मनोगत निबंध मराठी | Shaleche Manogat Essay in Marathi – निबंध क्र.03
// शाळेचे मनोगत //
मित्रांनो मी शाळा बोलत आहे. दगड विटांनी बनलेली मी एक निर्जीव वस्तू आहे. तुमच्यासारख्या मुलांमुळे मला सजीवत्व प्राप्त झाले आहे. तुम्हीच माझे सर्वात जवळचे मित्र आहात. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येतात. मुलांना विविध क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी मला वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब अशा भागांमध्ये विभागले आहे. मुलांच्या गप्पा-गोष्टी, दंगा-मस्ती यामुळे मी उत्साही असते.
परंतु सुट्टीच्या दिवशी शांत वातावरणात मला अजिबात करमत नाही. मे महिन्याच्या सुट्टीत शाळा सुरू होण्याची मी आतुरतेने वाट बघत असते. मुलांच्या आनंदात मला आनंद मिळतो. इयत्ता पहिली ते दहावीचे माझे वर्ग तुम्ही छान सजवले आहेत. वर्गाची स्वच्छता, रंगीत पताके, भिंतीवरील अभ्यासपूर्ण तक्ते, चित्राने सजवलेल्या काचपेट्या यामुळे माझे सौंदर्य आणखी वाढले आहे.
दररोज फळ्यावर लिहिलेले सुंदर सुविचार वाचून मला खूप छान वाटते. शिक्षक शिकवताना मुलांची वर्गातील शांतता पाहून मला प्रसन्न वाटते. मधल्या सुट्टीत डबे खाताना तुमच्या गप्पा-गोष्टी, दंगा-मस्ती मी बघत असते. तुमच्यासारख्या मुलांमुळेच माझे मनोरंजन होते. अनेक राष्ट्रीय सण, नेत्यांची जयंती अशा कार्यक्रमांमध्ये तुमचा उत्साह पाहण्यासारखा असतो.
तुम्ही मिळवलेली बक्षिसे, प्रशस्तीपत्रके, आदर्श पुरस्कार आणि दहावीच्या गुणवत्तेतील मुलांचे यश पाहून मला फार अभिमान वाटतो. स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा, सहल अशा विविध उपक्रमामुळे माझे मन प्रफुल्लित होते. मुख्याध्यापक, शिक्षक आणि मुलांमुळेच माझे खरे अस्तित्व आहे. या सर्वांमुळेच मला भरल्यासारखे वाटते. विविध उपक्रमांमुळे मला विद्यार्थ्यांच्या विविध कला पाहायला मिळतात.
एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर मुलांचा जल्लोषपूर्ण नाच पाहून मलाही नाचावेसे वाटते. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभा वेळी मुलांच्या चेहऱ्यावरील दुःख मी पाहते. ही मुले मला सोडून जाणार या विचाराने मलाही भरून येते. मुले भाषणातून माझी स्तुती करतात तेव्हा खूप छान वाटते. मुलांच्या यशामुळे माझ्या प्रगतीचा आलेख पाहून मनाला समाधान मिळते.
मित्रांनो तुमच्या शिवाय माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही. शेवटी मी सर्वांना एवढेच सांगते की, मला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. सुट्टीच्या कल्पनेने तुम्ही खुश असला तरी एकटेपणाच्या कल्पनेने मी उदास होते. तुमच्या भविष्यासाठी तुम्ही कधीतरी मला सोडून जाणारच. तरीही माझी आठवण नेहमी मनात ठेवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
-: समाप्त :-
शाळेचे मनोगत निबंध मराठी | शाळेचे आत्मवृत्त निबंध मराठी – निबंध क्र.04
// मी शाळा बोलतेय //
होय मी शाळा बोलतेय. अरे मुलांनो कुठे आहात तुम्ही? शाळेची घंटा वाजली रे वाजली की तुम्ही सगळे माझ्याकडे धावत येऊ लागलात ना की तुम्हाला कवेत घ्यावेसे वाटते. पण हा कोरोना आला आणि तुमची ती गजबज, तो गोंधळ सगळेच नाहीसे झाले. तुम्ही एक सुरात प्रार्थना म्हणलात की माझं मन प्रसन्न होतं.
प्रार्थनेनंतर तुमची वर्गात जाण्यासाठी चाललेला गोंधळ, बड-बड, खेळ, चिडवा-चिडवी याचा मी मूकपणाने आनंद घेत असते.
आपल्या शाळेचे विस्तीर्ण मैदान आतुरतेने वाट बघतोय तुमची. मैदानावर चाललेले सामने, खेळ बघून तर डोळ्याचे पारणे फेटायचे. खेळ ऐन रंगात आल्यावर तुम्हा सगळ्यांचा जोश बघण्यासारखा असायचा. खूप धमाल करीत होतात तुम्ही. तुमच्या त्या आनंदाची मी साक्षीदार आहे.
आपल्या शाळेचा हिरवागार परिसर सगळ्या गावाचेच आकर्षण आहे. आज दीड वर्ष झाले शाळा बंद आहे. तरी शाळेतले शिक्षक, मामा शिपाई यांनी नवनवीन झाडे लावून परिसर सुशोभित केलाय.
काल गणिताच्या सरांनी माझ्या भिंतीवर भौमितीक आकार काढले. विज्ञानाच्या बाईंनी अन्नसाखळी रेखाटली. भूगोलाच्या सरांनी पृथ्वीगोल काढला. तसेच जगाचा नकाशा रेखाटून विविध देश दाखवले.
राज्यशास्त्र, कला, भाषा, इतिहास अशा विविध विषयांशी संबंधित माझ्या शाळेतील शिक्षकांनी आकार काढले. या सगळ्यांमध्ये भिंतीवर काच फलक फक्त रिकामे आहेत. त्यामध्ये तुमचे छोटे छोटे निबंध, चित्रकारी तेवढी बाकी आहे. बाकी भिंत मात्र बोलक्या झाल्यात.
कधी कधी माझ्या वाढत्या वयामुळे एखादा दुसरा अपघात होतो. तेव्हा सगळे माझ्यासाठी काळजीत पडतात. माझी काळजीपूर्वक दुरुस्ती केली जाते. यामुळेच गेली अनेक वर्षे मी तुमच्या सेवेला तत्परतेने उभी आहे.
आता बास झाला हा कोरोना! तुमच्याशिवाय माझ्या अस्तित्वालाच अर्थ वाटत नाही. लवकरात लवकर हे संकट टळू दे. आणि माझी मुलं मला परत भेटू दे हीच इच्छा.
-: समाप्त :-
सारांश | शाळेचे मनोगत निबंध मराठी | Shaleche Manogat Nibandh Marathi
मित्रांनो वरील लेखात आपण शाळेचे मनोगत निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 04+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघितले. वरील निबंध हे आत्मकथनात्मक प्रकारचे आहेत. शाळेत परीक्षेमध्ये ही निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.
आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.
शाळेचे आत्मवृत्त निबंध मराठी
Shaleche Manogat Essay in Marathi
शाळेचे आत्मवृत्त निबंध मराठी
शाळेचे मनोगत निबंध मराठी
Shaleche Manogat Nibandh Marathi