मराठी विरामचिन्हे संपूर्ण माहिती | Viram Chinh in Marathi

विरामचिन्हांचे महत्व | Importance of Viram chinh

Viram Chinh in Marathi – आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना, विचार वाचतो. हे वाचन कधी मनातल्या मनात असते, तर कधी कधी आपण हे वाचन प्रकटपणानेही करतो. कथा, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्यप्रकारांत अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. या व अशा सर्व ठिकाणी आपल्याला विरामचिन्हांचा खूप उपयोग होतो. आपल्या लेखनात वाक्यरचनेचे जसे महत्त्व आहे, तसेच विरामचिन्हांचे महत्त्व आहे.

 • आपल्या प्रकट वाचनत विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेऊन वाचन करणे, हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे.
 • वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात.
 • हा विराम आपण कधी ‘अगदी कमी’ वेळ घेतो, तर कधी ‘थोडा वेळ’ तर कधी ‘अधिक वेळ’ घेतो.
 • हे दाखविण्यासाठी आपण विरामचिन्हांचा वापर करतो.
 • केव्हातरी प्रश्न विचारणे, आश्चर्य, आनंद व्यक्त करणे यांसाठी आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो.
 • त्या त्या वेळी भिन्न-भिन्न चिन्हे आपण वापरतो.
 • अशा विराम चिन्हांचे महत्त्व आपल्या प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी व वाचनाच्या वेळी लक्षात घेणे महत्त्वाचे असते.
 • मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढ-उतारावरून त्याला काय म्हणायचे ते समजते.
 • पण हेच लिहून दाखविले कि कोणता उद्गार कोणाचा, त्याचे वाक्य कोठे संपले, दुसऱ्याचे कोठून सुरू झाले हे समजत नाही.
 • शिवाय बोलणारा प्रश्न विचारतो की उद्गार काढतो की साधे विधान करतो हेही समजत नाही.
 • बोलणाऱ्याच्या मनातला आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा कीवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत.
 • विरामचिन्हे आपल्या लेखनात नसली, तर वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारावयाचे हेच मुळी समजणार नाही; म्हणून योग्य विरामचिन्हांचा वापर कोठे व केव्हा करावा याची कल्पना आपणांस अवश्य हवी.

विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत.

१. विराम दर्शविणारी

२. अर्थबोध करणारी

 • विरामचिन्हे म्हणजे केवळ तांत्रिक बाब नाही. मजकुरातील आशय, अर्थ, भावना, बोलणाऱ्याचा अविर्भाव हे लक्षात घेऊन लिहिताना व वाचताना त्याचा उपयोग करावा लागतो.
 • प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी केलेली ‘अभिवाचने’ या संदर्भात विद्यार्थ्यांनी अभ्यासावीत. ‘म्हैस’, ‘नारायण’, ‘चितळे मास्तर’ ही अभीवाचने उदाहरणादाखल घेता येतील.
 • असा अभ्यास करताना मूळ साहित्यकृती वाचावी, अभ्यासावी, त्यातील विरामचिन्हांचा जागा लक्षात घ्याव्यात आणि नंतर त्यांच्या ध्वनीचित्रफिती काळजीपूर्वक ऐकाव्यात.
 • मराठी भाषेतील अशा ध्वनीचित्रफिती हा फार मोठा ठेवा आहे.
 • मान्यवर साहित्यिकांची अशी अभिवाचने अभ्यासून, विरामचिन्हांचा अभ्यास करण्यासाठी ती अवश्य ऐकावीत.
 • त्यामुळे विराम दर्शवणारीअर्थबोध करणारी विरामचिन्हे आपणही आपल्या लेखनात परिणामकारक रीतीने वापरू शकू.

विरामचिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh in Marathi

१. पूर्णविराम (.)

२. अर्धविराम (;)

३. स्वल्पविराम (,)

४. अपूर्णविराम (उपपूर्णविराम) (:)

५. प्रश्नचिन्ह (?)

६. उद्गार चिन्ह (!)

७. अवतरण चिन्ह – १. एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘) २. दुहेरी अवतरण चिन्ह (” “)

८. संयोग चिन्ह (-)

९. अपसरण चिन्ह (स्पष्टीकरण चिन्ह) (_)

१०. विकल्प चिन्ह (/)

११. गोल कंस (…..)

१२. लोप चिन्ह …….

१३. एकेरी दंड (|) , दुहेरी दंड (||)

१४. संक्षेप चिन्ह (.)

Viram Chinh in Marathi – लेखनात वारंवार येणारी प्रमुख विरामचिन्हे व त्यांचे प्रकार कोणती व ती केव्हा वापरतात ती खालील प्रमाणे दिली आहेत त्यांचा नीट अभ्यास करा.

१. पूर्णविराम (.)

विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी पूर्णविराम (.) हे विराम चिन्ह वापरले जाते.
उदाहरण –

 • श्याम चे काम झाले.
 • आईने भाजी केली.
 • रामाचे खेळून झाले.
 • श्याम गावी गेला.

२. अर्धविराम (;)

दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना अर्धविराम (;) या चिन्हाचे उपयोग होते.
उदाहरण –

 • विजा खूप कडकडात होत्या; पण पाऊस पडला नाही.
 • श्यामने लग्नात येण्याची खूप आश्वासन दिले होते; पण तो आला नाही.
 • शेतकरी खूप कष्टाने भाजीपाला पिकवतो; पण त्याला योग्य तो मोबदला मिळत नाही.
 • निवडणुकीत नेते खूप आश्वासन देतात; परंतु निवडून आल्यावर काहीच काम करत नाही.

३. स्वल्पविराम (,)

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, संबोधन दर्शविताना तसेच ‘हे’, ‘की’ ‘असे’ ‘यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना स्वल्पविराम (,) या चिन्हाचा उपयोग होतो.
उदाहरण-

 • हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात.
 • राम, इकडे ये.
 • त्याला वाटले, की आपण तिथे जायला हवे.
 • चहा बनविताना साखर, पत्ती तसेच दूधाची आवश्यकता असते.

४. पूर्णविराम (उपपूर्णविराम) (:)

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विराम चिन्ह (:) या चिन्हाचा उपयोग केला जातो.
उदाहरण-

 • पुढील क्रमांकांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले: १,७,९,३५,६५
 • पुढील क्रमांकाची आसने खाली आहेत: 506,203,801,102
 • रामाला मराठी, गणित, हिन्दी या विषयात अनुक्रमे मार्क मिळाले: ७८, ९६, ९९
 • या क्रमांकांच्या विषयाचा अभ्यास करा: ४,६,८,९.

५. प्रश्नचिन्ह (?)

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तसेच एखाद्या व्यक्तीच्या अधिकृत ते बद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह (?) टाकले जाते.
उदाहरण-

 • तू केव्हा गेलास?
 • आमचे विद्वान मित्र (?) म्हणाले….
 • त्याने असे का केले?
 • तुझे नाव काय आहे?

६. उद्गार चिन्ह (!)

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह (!) वापरले जाते.
उदाहरण-

 • शाबास! छान खेळलास.
 • अरे रे! तो नापास झाला.
 • अरे रे! तो पडला.
 • अरे वा! किती छान.

७. अवतरण चिन्ह

१. एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘)

एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता, तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘) वापरले जाते.
उदाहरण-

 • मुल ध्वनींना ‘वर्ण’ असे म्हणतात
 • ‘व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा’ असं त्यांनी सांगितलं.

२. दुहेरी अवतरण चिन्ह (” “)

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता दुहेरी अवतरण चिन्ह (” “) वापरले जाते.
उदाहरण-

 • तो म्हणाला, “मी येईन.”
 • आई म्हणाली, “शाम दुकानात गेला.”

८. संयोग चिन्ह (-)

दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह (-) वापरतात.
उदाहरण-

 • कांदा-पोहे, प्रेम-विवाह
 • आजचा कार्यक्रम शाळे- पुढील पटांगणावर होईल.
 • साखर-पुडा
 • आई-बाबा

९. अपसरण चिन्ह (स्पष्टीकरण चिन्ह) (_)

बोलता – बोलता विचार मालिका तुटल्यास तसेच स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास अपसरण चिन्ह (_) वापरतात.
उदाहरण-

 • मी तिथे गेलो पण_
 • तो मुलगा _ ज्याने बक्षीस मिळविले _ आपल्या शाळेत आहे.
 • तो आला पण_
 • त्याने पोलिस भरतीची खूप तयारी केली पण_

१०. विकल्प चिन्ह (/)

एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास विकल्प चिन्ह (/) वापरतात.
उदाहरण-

 • विद्यार्थ्यांनी आई / वडील / स्थानिक पालकांना ही माहिती देणे आवश्यक आहे.
 • मुलांना तुम्ही क्रिकेट/ खो-खो /कबड्डी काही खेळू शकतात.
 • तुम्ही पोलिस/आर्मी/ग्रामसेवक भरती करू शकतात.
 • तुम्ही माळसेज/कसारा घाट मार्गे जाऊ शकतात.

११. गोल कंस (…..)

एखादी गोष्ट मुख्य मुद्दात घालायची नसेल, पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात (…..) ती माहिती टाकली जाते.
उदाहरण-

 • काही लोकांनी संस्थेच्या पैशांचा योग्य उपयोग होत नसल्याची (हे महाभाग संस्थेच्या देखभाल खर्च देत नसली तरी) तक्रार केली.

१२. लोक चिन्ह …….

एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना लोप चिन्ह …. वापरतात.
उदाहरण-

 • आयुष्य ……. एक सुंदर कलाकृती……. आज विचार करताना जाणवतं……
 • आयुष्य जगून घ्या कारण….

१३. एकेरी दंड (|) , दुहेरी दंड (||)

हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते. सामान्यतः रचनेतला एकेक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड (|), तर चार चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड (||) असे दिसते.
उदाहरण-
आता विश्वात्मके देवे |
येणे वाग्यज्ञे तोषावे |
तोषोनि मज द्यावे
पसायदान हे ||

१४. संक्षेप चिन्ह (.)

शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अध्यक्षरापुढे संक्षेप चिन्ह (.) वापरतात.
उदाहरण-

 • ता. क. (ताज कलम)
 • वि. वा. शिरवाडकर (विष्णू वामन शिरवाडकर)
 • ता. जि . (तालुका , जिल्हा)

सारांश | Conclusion

महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किवा शाळेतील / महाविद्यालयातील परिक्षेची तयारी करताना मराठी व्याकरण हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज या लेखात आपण मराठी विरामचिन्हे संपूर्ण माहिती | Viram Chinh in Marathi या सर्व बाबींची संपूर्ण सखोल माहिती जाणून घेतली आहे. आम्हाला आनंद आहे की तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचला. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या लेखातून मराठी विरामचिन्हांची संपूर्ण माहिती (Viram Chinh in Marathi) मिळाली असेल. धन्यवाद ordar.in ला भेट दिल्याबद्दल.

Leave a Comment